सावध स्पर्धा!!!


स्पर्धा झालीच पाहिजे.
स्वत:शी आणि इतरांशी सुद्धा...

पण सध्यातरी वैयक्तिक आणि संस्था/व्यवसाय अशा
कोणत्याही पातळीवर माझी मात्र कोणाशीही स्पर्धा नाही.

किंबहुना

हल्ली मी स्पर्धा मानत नाही.
कारण कोणाशीही - कोणत्याही कारणासाठी 
स्पर्धा करणं हल्ली माझ्या मनातही येत नाही.
कारण, माझा एकत्र येण्यावर, एकत्र काम करण्यावर, एकत्र जिंकण्यावर जास्त विश्वास आहे. मला अनेक वर्ष ओळखणाऱ्या अनेकांना हे माहीत आहे.

पण तरीही माझ्याशी कोणी तगडा स्पर्धक स्पर्धा करत असेल तर त्याचेही मी नेहमी कौतुकच करतो. प्रोत्साहन देतो. गरज असल्यास प्रत्यक्ष मदतही करतो. 

कधीकधी असंही होतं की...

तुमच्याशी स्पर्धा करायची ज्यांची पात्रता सुद्धा नाही असेही लोक जेंव्हा तुमच्याशी स्पर्धा करायला सज्ज होतात तेंव्हा हसुही फुटतं आणि धक्काही बसतो. त्यांनाही आपण मनोमनी किंवा जाहीर शुभेच्छा द्यायला पाहिजेत आणि हो मी देतोसुद्धा. 

कधीकधी असंही होतं... नव्हे तर सध्या होत आहे की...

तुमच्याच तालमीत तयार झालेले, तुमचे एकेकाळी विद्यार्थी-कर्मचारी-हितचिंतक असलेले सज्जन लोक तुमच्या नकळत, तुमच्या अपरोक्ष, तुमच्याकडे चक्क दुर्लक्ष करून वर तुमच्यासारखेच कार्यक्रम, तुमचेच कॉन्टॅक्टस, तुमचेच क्लाईंटस्, आणि तुमचेच माजी कर्मचारी घेऊन मैदानात येतात. तेंव्हा मात्र आपण थोडंतरी सावध होणं गरजेचं आहे. 

भले तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान, कौशल्य, तुमच्या ओरिजिनल कल्पना कोणी पळवू शकले नाही तरी सगळ्याच गोष्टी हलक्यात घेऊ नये... हे ही खरं आहे.

तर, मित्रांनो, 

स्पर्धा नैतिक की अनैतिक?
स्पर्धा असावी की नसावी?
स्पर्धा चांगली की वाईट?
स्पर्धा निरोगी हवी की चुरशीची?
स्पर्धा सकारात्मक की नकारात्मक?
यावर नंतर नक्की बोलूया, अगदी सविस्तर बोलुया...
पण सध्या मात्र सावध राहुया. 

हे जग एक शाळा आहे... वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर स्पर्धेचे, इर्षेचे चांगले-वाईट, विविध अनुभव घेत राहा... आणि आपले अनुभव शेयर करत राहा... मनात स्पर्धा असो-नसो... स्पर्धेला सज्ज राहा... फक्त तुम्हालाच जिंकायचं म्हणुन स्पर्धेत उतरू नका. तर आपल्या टीम सदस्यासोबतच आपल्यासोबत स्पर्धेत उतरलेला स्पर्धकही जिंकेल याचा प्रयत्न करा.

तुम्हाला कोणी सोडून जातंय किंवा जाणीवपूर्वक टाळत आहे म्हणुन वाईट वाटून घेऊ नका आणि उगाच पस्तावू तर नकाच... आपले काम असे करत राहा की तुम्हाला सोडून जाणारे, तुम्हाला टाळणारे एक दिवस पस्तावतील... तेंव्हा त्यांना पुनः तुमच्यासोबत घेण्याचा मनाचा मोठेपणा ठेवा. 

मित्रांनो, हे जग खरंच सुंदर आणि कलात्मक आहे... 
फक्त आपली दृष्टी (आणि स्पर्धा) सुंदर आणि सकारात्मक हवी !

- ब्रॅंडबॉण्ड 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट